Ad will apear here
Next
अर्धसत्य : व्यवस्थेचा प्रभावी आणि सशक्त क्रॉस-सेक्शन

१९८०च्या दशकातल्या ढवळून निघालेल्या सामाजिक परिस्थितीचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणजे ‘अर्धसत्य’ हा चित्रपट. गोविंद निहलानी दिग्दर्शित, श्री. दा. पानवलकर यांच्या ‘सूर्य’ या कथेवर आधारित असणारा हा चित्रपट काळाच्या पुढचा आणि अतिशय बोल्ड पद्धतीने वास्तववादी घटना मांडणारा चित्रपट ठरतो... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘अर्धसत्य’ या हिंदी चित्रपटाबद्दल....
...............................
‘अर्धसत्य’ हा गोविंद निहलानी दिग्दर्शित नितांत सुंदर सिनेमा. श्री. दा. पानवलकर यांच्या ‘सूर्य’ या कथेवर आधारित असणारा अर्धसत्य म्हणजे १९८०च्या दशकातल्या ढवळून निघालेल्या सामाजिक परिस्थितीचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. दिलीप पुरुषोत्तम चित्रेंची ‘चक्रव्यूह’ कविता, वसंत देवांनी लिहिलेले मार्मिक संवाद, पानवलकरांची कथा, त्याला साजेशी विजय तेंडुलकरलिखित पटकथा, उत्तम अभिनय आणि कसदार दिग्दर्शन या ‘अर्धसत्य’च्या जमेच्या बाजू. 

अर्धसत्यच्या केंद्रस्थानी आहे अनंत वेलणकर (ओम पुरी) नावाचा एक सब-इन्स्पेक्टर. अनंत वडिलांच्या इच्छेखातर पोलीस खात्यात भरती झाला. त्याचा मूळ पिंड वेगळा. आजूबाजूच्या घटना संवेदनशीलपणे टिपणारा. एकाच वेळी कठोर आणि हळवा असणारा. वडिलांच्या धाकात लहानाचा मोठा झालेला आणि स्वतःच्या मर्जीविरुद्ध पोलिसात भरती झालेला अनंत आपली हळवी बाजू शक्यतो लपवून ठेवतो. सिस्टिमच्या चक्रात सामील होतो. लहानसहान अन्याय त्याला सहन होत नाहीत. विशेषतः महिलांची छेड काढणारे गुन्हेगार त्याच्या डोक्यात जातात. अशा वेळी संधी मिळताच तो कायदा हातात घेतो आणि अशा गुन्हेगारांना झोडपत सुटतो. गरम डोक्याच्या आणि कडक शिस्तीच्या अनंतला, तो भरकटतोय असे लक्षात आल्यावर ताळ्यावर आणायचे काम त्याचे वरिष्ठ सहकारी हैदरअली (शफी इनामदार) आणि मैत्रीण ज्योत्स्ना गोखले (स्मिता पाटील) करत असतात. या सगळ्यांत कधी कधी परिस्थिती हाताबाहेर जाते. गोलचौकी या मुंबईच्या पोलिस ठाण्यात सब-इन्स्पेक्टर म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच त्याची गाठ त्या भागातल्या भाईशी, म्हणजे रामा शेट्टीशी पडते. 

बेकायदेशीर धंदे राजरोसपणे करणारा हा रामा शेट्टी, पैशाच्या बळावर अनेक मोठ्या हस्तींच्या आशीर्वादाने आपले दुकान चालवत असतो. ही पार्श्वभूमी माहीत नसल्याने जेव्हा अनंत, रामा शेट्टीच्या माणसांना कच्च्या कैदेत टाकतो, तेव्हा त्यांची पूर्ण चौकशी व्हायच्या आतच रामा शेट्टी त्यांना सोडवून नेतो. वरिष्ठ अधिकारी अनंतला न विचारता या लोकांच्या सुटकेचे आदेश देऊन टाकतात. यामुळे अनंत बिथरलेला असतानाच, रामा शेट्टी त्याच्यासाठी ‘येऊन भेट’ असा निरोप पोलीस चौकीवर सोडून जातो. पहिल्या भेटीत रामा शेट्टी त्याच्या ‘इन्फ्लुएन्शिअल पॉवर’ची कल्पना अनंतला देतो. आधीच गरम रक्ताचा असणारा अनंत यामुळे अधिकच भडकतो. प्रत्येक दिवसागणिक अनंत आणि रामा शेट्टी यांच्यातला संघर्ष वाढत जातो. सगळ्या गोष्टी माहीत असून, सहन करूनही डोके शांत ठेवणारा इन्स्पेक्टर हैदर अली शफी इनामदार यांनी मोठ्या झोकदारपणे साकारला आहे. 

शांत डोक्याचा, मितभाषी आणि गजब उर्दू संवाद म्हणणारा हैदर, अनंतला वेळोवेळी योग्य ते सल्ले देत असतो. दुसरीकडे मैत्रीण ज्योत्स्ना गोखले अनंतला आधार देत असते; पण त्याच वेळी ती विचारांनी स्वतंत्र असते. सामाजिक कार्यकर्त्यांचे विचार ऐकताना, पेपरमधल्या बातम्या वाचताना पोलिसांच्या क्रूरतेविषयी तिला घृणा वाटते. अनंतही याच प्रकारे वर्तन करत असेल का, प्रचलित सिस्टीम अनंतलाही क्रूर बनवेल का, या चिंतेने तिचे मन पोखरले जाऊ लागते. बापाच्या जाचात वाढलेला, बाप आईला मारहाण करत असूनही एकदाही तिला त्यापासून वाचवू न शकणारा अनंत, एक प्रकारच्या अदृश्य ताणासकट वावरत असतो. मनाविरुद्ध पोलिस खात्यात असलेली नोकरी, नोकरीतले ताणतणाव, रामा शेट्टी नामक पत्रिकेतला शनी, इन्स्पेक्टर लोबो नावाचे एक महत्त्वाचे रूपकात्मक पात्र (ज्याच्यात अनंत स्वतःला बघतो) इत्यादी गोष्टींमुळे अनंत नकळत व्यसनाधीन होतो. ऑन ड्युटी दारू पिऊ लागतो. यामुळे त्याच्या कामावर तर परिणाम होतोच, पण त्याच्या आणि ज्योत्स्नाच्या नात्यातही एक गुंता निर्माण होतो.

‘He, who fights monsters must take care lest he become a monster’, असं नित्शेचं एक सुरेख वाक्य आहे. त्याची प्रचीती अर्धसत्य बघताना वारंवार येते. एकीकडे अनंतची मनस्थिती ढासळू लागते, तर दुसरीकडे रामा शेट्टीची ताकद वाढत जाते. अशा परिस्थितीत अनंतवर त्याचे वडील लग्नाबाबत बळजबरी करू पाहतात. ‘माझ्या पसंतीच्याच मुलीशी तू लग्न करायला हवंस’, असं सांगितल्यावर, लहानपणापासून वडिलांसमोर कायम दबून वागत आलेला अनंत पेटून उठतो. वडिलांना खडे बोल सुनावतो. आयुष्यभर दादागिरी गाजवणारे वडील, प्रचंड मोठा धक्का बसून अनंतच्या या नव्या अवताराकडे पाहत राहतात. त्यांना बहुधा त्यांची चूक उमजते. नंतर काही प्रसंगांमधून ते अनंतच्या मनात आपल्याबद्दल प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात; मात्र लहानपणापासून आपल्या आईवर ते करत असलेला अन्याय तो विसरू शकत नाही. परंतु नंतर अनंतच्या मनातला हळवा कोपरा अजूनही ओलसर आहे, हे दाखवणारा सीनही तितकाच हळवा आणि बोलका आहे. यानंतर लगेचच सिनेमा शेवटाकडे येऊ लागतो. 

इन्स्पेक्टर लोबोचा अनपेक्षित शेवट, एका महत्त्वाच्या कारवाईमध्ये महत्त्वाची भूमिका साकारूनही अनंतला त्याचे श्रेय न मिळणे, नोकरीतला ताण, शत्रूंची वाढती ताकद, ज्योत्स्नाबरोबरच्या हळव्या नात्यात उत्पन्न झालेला अपरिचित ताण, वाढती व्यसने आणि ढासळलेली मनःस्थिती, या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन अनंतचा तोल पुरता ढासळतो. त्याच्या हातून एका कैद्याची पोलिस स्टेशनमध्ये हत्या होते. त्याला सस्पेंड केले जाते. ज्योत्स्नाला ज्या गोष्टीची भीती वाटत असते, तेच होते. 

इन्स्पेक्टर हैदर अली अनंतला, परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल, तर रामा शेट्टीशी हातमिळवणी कर, असा सल्ला देतो. पूर्वी झालेले अपमान गिळून, संपूर्णपणे हरलेल्या अनंतसमोर हे ऐकण्यावाचून आणि तसे करण्यावाचून काहीही पर्याय उरलेला नसतो. त्याची सर्व बाजूंनी कोंडी झालेली असते. हताश मनःस्थितीत तो रामा शेट्टीची भेट घेतो. पहिल्या भेटीतला अनंत आणि शेवटच्या भेटीतला अनंत या दोन संपूर्णपणे वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असे वाटावे, इतका अनंत बदललेला असतो. लोबोच्या पात्राच्या माध्यमातून अनंत आपला भविष्यकाळ बघत असतो. मैत्रिणीची बदललेली भूमिका त्याला समजू शकत नाही. केलेल्या कामगिरीचे श्रेय न मिळालेल्या, कैद्याच्या अनपेक्षित हत्येमुळे कोंडीत सापडलेल्या अनंतला नेमके काय करायचे हे उमगत नसते. रामा शेट्टीशी होणारी ही भेट अतिशय महत्त्वाची असते. या भेटीत अनंत जो निर्णय घेणार असतो, त्यावर त्याच्या आयुष्याची पुढची दिशा अवलंबून असते. अशा महत्त्वाच्या भेटीप्रसंगी, एखाद्या ज्वालामुखीसारखा धगधगणारा अनंत, नेहमीसारखाच भावनाशील होऊन गरम डोक्याने निर्णय घेतो की डोके थंड ठेवून, हे प्रत्यक्षच पाहणे उचित ठरेल. 

व्यवस्था लोकांची मिळून बनते. कधी लोक व्यवस्थेला वापरतात, तर कधी व्यवस्था लोकांना. अर्धसत्य हा अशाच एका व्यवस्थेचा क्रॉस-सेक्शन आहे. चित्रेंच्या कवितेतला चक्रव्यूव्ह म्हणजे ही व्यवस्थाच आहे. हा निव्वळ एक चित्रपट नाही. व्यवस्थेमुळे भरडून निघणाऱ्या एका कॉमन मॅनची गोष्ट आहे. एक वेगळा अनुभव आहे. विविध व्यक्ती, त्यांची विचार करण्याची वेगवेगळी पद्धत, त्यांच्या विचारांचा संघर्ष, त्यामुळे उत्पन्न होणारा ताण, त्या ताणाने एखाद्या घटनेच्या रूपाने व्यक्त होणे याचा जिवंत दृष्यरूप अनुभव म्हणजे अर्धसत्य. 

सध्या फिल्मिंगची तंत्रे प्रचंड प्रगत झाली आहेत. त्या तुलनेत जुने सिनेमे पाहताना तितके आकर्षक वाटत नाहीत. संथ वाटतात. जुन्या काळात बनलेला सिनेमा पाहताना फार वेळ त्यातला रस टिकून रहात नाही. अर्धसत्य मात्र याला अपवाद आहे. सध्या आपल्याला बऱ्याच गोष्टीचे एक्स्पोजर असते. आपली मने तुलनेने बोथट झाली आहेत; पण १९८०चे वर्ष आणि तत्कालीन समाजाचा विचार करता, अर्धसत्य काळाच्या पुढचा आणि अतिशय बोल्ड पद्धतीने वास्तववादी घटना मांडणारा चित्रपट ठरतो. बोल्ड स्टेटमेंट करताना त्याचा तोल जराही ढळत नाही. काही प्रसंग निश्चितच अंगावर येणारे आहेत, हादरवणारे आहेत; पण ते बटबटीत नाहीत. माणूस जिवंत जाळणे, कच्च्या कैदेतल्या कैद्यांवर अनंतचे तुटून पडणे इत्यादी गोष्टी, अर्धसत्य प्रदर्शित झाला त्या काळात लोकांना जबरदस्त धक्के देऊन गेल्या असाव्यात. आज आपल्याला मिळणाऱ्या एक्सपोजरमुळे त्या तितक्याशा भयंकर भासत नसल्या, तरी अस्वस्थ जरूर करतात. कॅमेरा मूव्हमेंट्स, संकलन, संथ गतीने सरकणारी, पण घट्ट वीण असलेली पटकथा, उत्तम कथा, जोमदार अभिनय आणि कसदार दिग्दर्शन अशा सगळ्याच गोष्टी सुयोग्य रीतीने जमून आल्यामुळे हा सिनेमा ऑलटाइम क्लासिक ठरतो. ‘अर्धसत्य’ हा व्यवस्थेचे एकूण स्वरूप दाखवणारा अतिशय प्रभावी असा क्रॉस-सेक्शन आहे. जर तुम्हाला रिअॅलिस्टिक सीरियस चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर अर्धसत्यसारखा सशक्त सिनेमा चुकवून चालणार नाही... 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZUHBV
Similar Posts
मायाबाजार प्रेम ही आदिम भावनांपैकी सर्वांत महत्त्वाची भावना. साहित्य, चित्र, संगीत, शिल्प, नाटक, चित्रपट इत्यादी कोणत्याही स्वरूपातला कलाविष्कार सादर करताना, प्रेम हा विषय कायमच अग्रणी राहिला आहे. या सुखद, हुरहुर लावणाऱ्या भावनेचा आपण प्रत्येकाने कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनुभव घेतलेला असतो. सिनेमा
जंगल : अंगावर काटा आणणारा थरार सुशांत सिंगचं दुर्गा सिंग म्हणून केलेलं मोअर दॅन परफेक्ट कास्टिंग, उर्मिला मातोंडकरचा उत्कृष्ट अभिनय, अतिशय वेगळा विषय, तो जिवंतपणे मांडणारी जयदीप साहनीची पटकथा आणि या सगळ्याला साजेसं असणारं राम गोपाल वर्माचं दिग्दर्शन हे ‘जंगल’ सिनेमाचं वैशिष्ट्य. १८ वर्षं होऊनही आजही ताजातवाना वाटणारा हा चित्रपट राम
अंधाधुन : श्रीराम राघवनची लक्षवेधी आंधळी कोशिंबीर ‘निओ नुआँ’ जॉनरचा बादशहा असलेल्या श्रीराम राघवनचा ‘अंधाधुन’ हा सिनेमा २०१८मध्ये आलेल्या सिनेमांपैकी सर्वांत लक्षवेधी आणि महत्त्वपूर्ण प्रयोग करणारा सिनेमा ठरला. ब्लॅक कॉमेडीच्या वळणाने जाणारा हा क्राइम थ्रिलर, मुक्त पद्धतीचा शेवट (ओपन एंड) असूनही प्रेक्षकांनी उचलून धरला. प्रचंड वेगानं घडणाऱ्या असंख्य
तारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती आपल्या आजूबाजूच्या, आपल्या रोजच्या वावरण्यात असणाऱ्या जगातल्याच वास्तू, व्यक्ती किंवा साध्याश्याच वाटणाऱ्या घटना वेचून, कमीत कमी शब्दांत गूढ आणि भयाची निर्मिती करणं, ही रत्नाकर मतकरींची खासियत आहे. जोरदार पाऊस पडत असला, विजा कडाडत असल्या, वीज गेलेली असली, की मला त्यांची ‘तारकर’ ही भयकथा हमखास आठवते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language